संतापजणक: बीफ विक्रीच्या संशयातून वृध्दाला मारहाण; डुकराचे मासही चारले

0
579

चारीअली, दि. ९ (पीसीबी) – आसामच्या चारीअली शहरात बीफ विक्रीच्या संशयातून एका ६८ वर्षीय वृध्द मुस्लिम व्यक्तीला जमावाने जबर मारहाण करुन त्यांना चक्क डुकराचे मांस खायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

शौकत अली असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात एप्रिलला आसामच्या बिश्वनाथ चारीअली शहरात ही घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये शौकत अली चिखलामध्ये बसले असून त्यांना जमावाने चारही बाजूने घेरल्याचे दिसत आहे. तुम्ही बीफ विक्री का करता? तुमच्याकडे बीफ विक्रीचा परवाना आहे का? अशी जमावाकडून त्यांची उलटतपासणी सुरु असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

संतप्त जमाव शौकत अली यांच्याकडे नागरिकत्वाचीही विचारणा करताना व्हिडिओमध्ये दिसतो. तुम्ही बांगलादेशी आहात का? किंवा तुमच्याकडे एनआरसी प्रमाणपत्र आहे का? असे प्रश्न जमावाने त्यांना विचारले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत अली एका छोटा व्यावसायिक असून तो गेल्या ३५ वर्षांपासून या भागात एक भोजनालय चालवतो. जमावाने त्यांच्यावर बीफ विक्रीचा आरोप केला. शौकत अली जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आठवडी बाजार भरवणाऱा कमल थापा बरोबरही जमावाने गैरवर्तन केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात दोन एफआयआर दाखल झाले आहेत.