परप्रांतीयांची पाठवणी पोलिसांसाठी अजूनही डोकेदुखीच

0
288

पिंपरी, दि. २१(पीसीबी) : कोरोना विषाणूमुळे राज्यातील परप्रांतीयांचे लोंढे मूळगावी रवाना होऊ लागले आहेत. कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्येही परप्रांतीय संख्या सुमारे पाच लाखावर आहे. कोठेही नोंद नसलेल्या या परप्रांतीयांची माहिती संकलीत करून त्यांची पाठवणी करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली आहे. त्यामुळे त्यांची नोंद, त्यांचे तपासणी दाखले आदी छाननीचे काम वाढले आहे. अगोदरच दीड महिन्यांच्या टाळेबंदीत बंदोबस्तामुळे थकलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ जारी करण्यात आले आहे. शहरात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी कामगार वर्गांची उपासमार होऊ लागली. परप्रांतीयांनी गावची वाट धरली. मजूर कुटुंबीय गावाला पोहचण्यासाठी धडपड करू लागली. हिंजवडीमध्ये तर मजूरांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला.

या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने अडकलेल्या कुटुंबियांना आपल्या मूळ गावी जाऊ देण्यास परवानगी दिली. याबाबतची माहिती मिळताच परवाने मिळवण्यासाठी परप्रांतीयांनी पोलीस ठाण्यात गर्दी करण्यास सुरुवात केली. शेवटी पोलिसांनी परवाना देण्यासाठी काही विशेष कक्ष स्थापन केले आहेत. बहुतांश परप्रांतीय मजूर अशिक्षित असल्याने अर्ज करून त्यांना रीतसर परवाने मिळवून देण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागत आहे. काही ठिकाणी पोलिसांनी डाटा संकलित करण्यासाठी आयटीतील तरुणाची देखील मदत घेतल्याचे दिसून येत होते.
चाकण, म्हाळुंगे, हिंजवडी आणि वाकड या भागात गृहप्रकल्प आणि कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या भागात मजुरांची संख्या जास्त आहे.

त्यामुळे येथील पोलिसांनी मजुरांची माहिती संकलित करण्यासाठी काही विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथकातील कर्मचारी हद्दीतील कंपन्या, लेबर कॅम्प आदी परिसरात जाऊन मजुरांची माहिती घेत आहेत. त्यातील बहुतांश मजूर मूळगावी जाण्यासाठी आग्रही असल्याने त्यांची स्वतंत्र यादी बनवून त्यांना रीतसर परवाने मिळून देण्याचे प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, अनेक मजुरांकडे कागदपत्र नसल्याने अडचणी येत आहेत.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून आत्तापर्यंत पिंपरी, चिंचवड, सांगवी, चाकण , वाकड, हिंजवडी, निगडी , म्हाळुंगे, रावेत , भोसरी , भोसरी एमआयडीसी, तळेगाव , तळेगाव एमआयडीसी , आळंदी , दिघी असे एकूण ६५ हजारावर मजूर आपल्या मूळगावी रवाना झाले आहेत.