कोरोना साथीत गणेशोत्सव कसा होणार ?

0
295

पुणे, दि. २१ (पीसीबी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचे विविध सण समारंभ कसे होणार याबाबत राज्यातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तब्बल सहा-सात लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंधरा दिवस चालणारा आषाढी पालखी सोहळा रद्द झाल्यात जमा आहे. आता महाराष्ट्राची शान असलेला गणेशोत्सवसुध्दा कुठलेही भव्य दिव्य देखावे न करता एकदम साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय पुणेकर गणेश भक्तांनी आज घेतला. पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी त्यावर आज शिक्का मोर्तब केले. उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडणे, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणे, यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मंडळांच्या बैठकीत एकमत झाले. बाप्पाच्या मिरवणुकीबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

कोविड19 विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजाराचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदा पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करुन सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरुपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरुन पावित्र्य भंग होईल.