सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची महाबैठक; उद्धव ठाकरे भाग घेणार ?

0
309

प्रतिनिधी, दि.२० मे (पीसीबी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्या २२ मे रोजी १८ विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. ही महाबैठक व्हीडीओ कॉन्फरंसिंग द्वारे घेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा बाबतीत चर्चा करण्यासाठी युपीएची बैठक बोलविण्यात आली होती. शिवसेनाने त्या बैठकीत हजेरी लावली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी आदित्य ठाकरेंनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली उद्या होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे भाग घेण्यार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यामध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. २५ मार्च रोजी अचानकपणी लागू केलेला लॉकडाऊन आता चौथ्यांदा वाढविण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात घडलेल्या विविध मुद्द्यांच्या अनुशंघाने सोनिया गांधी यांनी यूपीए मधील घटक पक्षांची बैठक २२ मे रोजी आयोजित केली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण, स्थलांतरीत कामगारांचा मुद्दा, केंद्र सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज, पीएम केअर फंड, कामगार कायद्यातील सुधारणा आदी महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच लॉकडाऊनमुळे संसदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून संसदेच्या विविध स्थायी समित्यांची बैठक देखील स्थगित करण्यात आलेल्या आहेत. कॉग्रेसच्या अनेक खासदारांनी स्थायी समितींच्या बैठकी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्याची मागणी केली आहे. मात्र स्थायी समितीच्या बैठका ईनकॅमेरा असल्याने अशा बैठका व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यास कायदेशीर अडसर असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. देशांतर्गत विमानसेवा २५ मे पासून सुरु होणार असल्याने स्थायी समितीच्या बैठका आयोजित करण्याबाबत चर्चा या बैठकीत होऊ शकते. तसेच कॉंग्रेस अथवा युपीए शासित राज्यांमध्ये भाजपाने घेतलेल्या आक्रमक पावित्र्याला प्रत्युत्तर देण्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टी यांना देखील बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. यूपीएचे सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेला देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याबैठीला ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा बाबतीत चर्चा करण्यासाठी युपीएची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र शिवसेनेने त्याबैठकीत हजेरी लावली नव्हती. उद्या होणाऱ्या युपीएच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाग घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.