पंतप्रधानांच्या हत्येचे षड्‌यंत्र रचणारे गजाआड जाणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
570

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसा आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर केलेली कारवाई योग्यच होती, हे सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट झाले आहे. या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. देशाविरोधी कारवाई करणाऱ्या या पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत. हे पुरावे न्यायालयात  सादर करण्यात येणार आहेत, असे सांगून  पंतप्रधानांच्या हत्येचे षडयंत्र रचणारे गजाआड जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. 

या पाचही मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात अटकेची केलेली कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. यामुळे राज्यसरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या  निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली.

या पाचही जणांविरोधात  पुरावे गोळा केल्यानंतरच अटक केली आहे. हे सर्व पुरावे आम्ही न्यायालयात  सादर केले. त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, असे फडणवीस म्हणाले.
त्यांनी देशाविरोधात षडयंत्र रचले. पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला. जातीजातीत संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशात सिव्हिल वॉर सुरू होण्यासाठी षडयंत्र रचल्याचे उघड झाले आहे. या पाचही जणांविरोधात आणखी पुरावे आहेत, ते न्यायालयात सादर केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.