निवडणूक कोण जिंकणार?; पैज लावणाऱ्या मिरजेतील दोघांविरोधात जुगाराचा गुन्हा दाखल

0
651

सांगली, दि. २८ (पीसीबी) –  सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार यावरून एक लाखाची पैज लावणाऱ्या मिरजेतील दोघांविरोधात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील विजयी होणार की विशाल पाटील विजयी होणार? यावरून  या दोघा समर्थकांनी  एक लाख रुपयांची पैज लावली होती.  या पैजेसाठी नोटरीही करून घेतली होती.

याप्रकरणी भाजपकडून पैज लावणारे राजकुमार लहू कोरे (रा. विजयनगर) आणि स्वाभिमानीकडून पैज लावणारे रणजित लालासाहेब देसाई (रा. शिपूर) या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये चुरशीने लढत झाली.

मिरजेच्या मार्केट कमिटीमध्ये कामानिमित्त कोरे आणि देसाई भेटले होते. सांगलीचा खासदार कोण होणार याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर या दोघांनी १ लाख रुपयांची पैज लावली. यासाठी चक्क कायदेशीर ग्राह्य मानली जाणारी नोटरी करुन टाकली. तसेच निकालानंतरच्या तारखेचे म्हणजेच २४ मे  या तारखेचे एकमेकांच्या नावाचे चेकही दिले आहेत.