पनवेलच्या सुकापूरमध्ये मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यास अटक

0
685

पनवेल, दि २८ (पीसीबी) – पनवेलमधील सुकापूर मध्ये पैसे वाटप करणाऱ्या एका कार्यकर्त्याविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक ५ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख  महेंद्र गगलानी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रताप रामचंद्र आरेकर असे असून त्याचे वय ५९ आहे. तो  विठ्ठल मंदिराजवळ, सुकापूर येथे राहतो. त्याची झडती घेतली असता  त्याच्याकडे  ३३ मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या ७८ कोऱ्या व मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे ५८०० रुपये रोख रक्कम असलेले २९ खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात २०० रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय त्याच्याकडे  एक लाल रंगाची  पिशवी होती आणि त्यात १७८ पानी रजिस्टर व त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुळधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम सोसायटी अशी नावे व सदस्यांची नावे आढळली.

मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी  भा. द.वि.सं  कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.