नाशिक फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
1416

भोसरी, दि. १ (पीसीबी) – भरधाव अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला मागून दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.१६ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास नाशिक फाटा येथील पुणे-नाशिक हायवेवर असलेल्या पीसीएमसीचे सार्वजनिक सुलभ शौचालया समोर घडली.

प्रकाश गणपत चिपाडे (वय ५५, रा, सितामाई प्लॉट नं.१८ सी-९, सर्वे.नं.४ मोशी प्राधीकरण) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास प्रकाश चिपाडे हे त्यांच्या (एमएच/१४/एवाय/३६२६) या दुचाकीवरुन पुणे-नाशिक हायवेने मोशी प्राधिकरण येथील घरी निघाले होते. यावेळी त्यांची दुचाकी नाशिक फाटा येथील पुणे-नाशिक हायवेवर असलेल्या पीसीएमसीचे सार्वजनिक सुलभ शौचालया समोर आली असता मागून आलेल्या एक भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला. या अपघातात चिपाडे यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.