सांगवीत राहणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची एक लाखांची फसवणूक

0
734

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय ७०, रा. कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर) यांना ऑनलाईन माध्यमाव्दारे तब्बल १ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी कोत्तापल्ले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेणुका आचार्य आणि प्रशांत दीक्षित नावाच्या इसमांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना रेणुका आणि प्रशांत या दोघा आरोपींनी फोन आणि मेलव्दारे वेळोवेळी संपर्क साधून एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगून पॉलिसीचे जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून कोत्तापल्ले यांना आरोपींनी त्यांच्या बँक खात्यामध्ये एक लाख रुपये भरण्यास सांगितले. कोत्तापल्ले यांनी ते भरले. मात्र आरोपींनी त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही आणि फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच कोत्तापल्ले यांनी तातडीने सांगवी पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार रेणुका आणि प्रशांत नावाच्या दोघा इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.