नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताचा थरार…! चालकाचे नियंत्रण सुटले अन…

0
411

पुणे,दि.२१(पीसीबी) – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टंँकर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची संख्या सुमारे ३५ ते ४० होती. किरकोळ जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाह्यवळण मार्गावर वेगाने निघालेल्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने रात्री नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्निशमन दल; तसेच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. टँकरच्या धडकेमुळे ४८ वाहनांचे नुकसान झाले. अपघातात दुचाकी, मोटारी, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर मोठी कोंडी झाली होती.

बाह्यवळण मार्गावरुन टँकर मुंबईकडे वेगाने निघाला होता. नवले पुलाजवळ तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनांना धडक दिली. रस्त्याच्या कडेला जाऊन टँकर धडकला. अपघातानंतर परिसरात घबराट उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढण्यात आले. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितलं की, नवले पुलाजवळ भरधाव टँकरने धडक दिल्याने ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात कोणी मृत्यमुखी पडले नसल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.