नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

0
234

जुन्नर, दि. १९ (पीसीबी) : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

फायनान्सवाले दमदाटी करतात, पतसंस्थावाले अपशब्द वापरतात, अशी चिठ्ठी या शेतकऱ्यांने लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरातील रानमळा येथे ही घटना घडली.

दशरथ लक्ष्मण केदारी या अल्पभूधारक शेतकऱ्यांने शनिवारी आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणा व शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केदारी यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळत नाही. याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे म्हणत शेवटी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रिजर्व बॅक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागीरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले आहे.