धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याचा आनंद नसून उलट दुख – मुनगंटीवार

0
331

पुणे, दि. १० (पीसीबी) : धनुष्यबाण हे शिवेसेनेचं निवडणूक चिन्ह नुकतंच केंद्रीय निवडणूक आय़ोगाने गोठवलं. त्यामुळे त्याचे काय परिणाम होणार यावर सध्या चर्चा सुरु आहे. तसेच विविध राजकीय नेतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. तशीच ती भाजप नेते व राज्याचे वन, सांस्कृत्रिक आणि मत्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी काल (ता.९ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याचा आनंद नसून उलट दुख झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती वाटते आहे, असेही ते म्हणाले.

धनुष्यबाण गोठविल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती एकीकडे व्यक्त करताना दुसरीकडे त्यांच्यावर मुनगंटीवारांनी कडाडून हल्लाबोल केला. आमच्या पक्षात परिवार म्हणजे देश आहे. तर, तिकडे (शिवसेना ठाकरे) आमचा देश म्हणजे आमचा परिवार, असे असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. दोन्ही कॉंग्रेसबरोबर जाण्याचा ठाकरेंचा चुकीचा मार्ग हा त्यांना खाईत घेऊन जाणार आहे, असे भाकितही त्यांनी केले. ते जेंव्हा सोनिया गांधीसमोर अर्धे झुकले, तेव्हाच भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी दुख झाले. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हॅक झाल्याचे दुख आहे. आदित्य ठाकरेंनी राहूल गांधींना नमस्कार करणे हा चुकीचा मार्ग आहे. त्याचेही दुख आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेबरोबरची बैठक आणि कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी मुनगंटीवार उद्योगनगरीत आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरेंवर ही तोफ डागली.

शिवसेना मोठी केलेल्या तसेच बाळासाहेब ठाकरेंचे विचार असलेल्या कडवट शिवसैनिकांवर दोन्ही कॉंग्रेसचे विचार उद्धव ठाकरेंनी लादण्याचा प्रयत्न केला. त्यांना जय सोनिया, जय शरद पवार म्हणायला लावले, तर ते कसे सहन करणार. म्हणून त्यांनी बंड केले, असे मुनगंटीवार म्हणाले. कॉंग्रेसबरोबर गेलो, तर मी माझे दुकान (शिवसेना) बंद करीन, असे बाळासाहेब म्हणाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. आता शिवसेना ही कॉंग्रेसबरोबर गेल्याने बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांनी तुमचे दुकान बंद केले,असा घणाघातही त्यांनी ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरे हे माझे मित्र असल्याने त्यांनी अजूनही सुधरण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. बाळासाहेबांची शिवसेना भाजपला पाहिजे, त्यांचे पूत्र नाही, या उद्धव ठाकरेंच्या टोमण्याचा समाचार त्यांनी घेतला. बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाहीत, तर त्यांचे इतर चिंरजीव आणि नातूही आहेत. ते तसेच बाळासाहेबांचे विचारही एकनाथ शिंदेसोबत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ हे शिंदेसोबत, तर तुमच्या कुटुंबाशी निष्ठा असलेले तुमच्यासोबत आहेत, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.