देहुगाव येथे शेकोटीतल्या आगीत गांजा नको टाकू असे सांगितल्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार

0
1332

देहुगाव, दि. २८ (पीसीबी) – “शेकोटीतल्या आगीत गांजा नको टाकू नाही तर गावातील लोक मला वेसनी म्हणतील,” असे बोलल्याचा राग आल्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवार (दि.२५) रात्री साडेनऊच्या सुमारास देहुगाव माळवाडी येथे घडली.

आशीष टिळेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल दत्तात्रय गोपीनाथ टिळेकर (वय ५५, रा. देहुगाव माळवाडी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर बालदत्तात्रय सराफ (रा. देहुगाव माळवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार रात्री साडेनऊच्या सुमारास देहुगाव माळवाडी येथे आशीष टिळेकर याने ठंडी असल्या कारणाने शेकोटी केली होती. यावेळी आरोपी शंकर सराफ याने त्या शेकोटीत गांजा टाकला. यामुळे गांजाचा वास येऊ लागला. यावर आशीष याने शंकर याला “आगीत गांजा टाकू नको नाहीतर गावातील लोक मला वेसनी म्हणतील”, यामुळे रागावलेल्या शंकर याने त्याच्या जवळील धारदार हत्याराने आशीष टिळेकर याच्या हातावर आणि गालावर वार करुन जखमी केले आणि फरार झाला. याप्रकरणी शंकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.