धक्कादायक: अमरावतीत आईवर वार करणाऱ्या धाकट्या भावाचा मोठ्या भावाने केला खून

0
698

अमरावती, दि. २८ (पीसीबी) – आमदाराच्या मुलीशी लग्न लावून देण्याचा हट्ट करत आईवर चाकूने हल्ला करणाऱ्या धाकट्या भावाचा रागाच्या भरात मोठ्या भावानेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दहिसाथ अमरावती येथे घडली.

शिवप्रसाद जयसिंग राजपूत (वय २८, रा. महाल, नागपूर) असे मृत धाकट्या भावाचे नाव आहे, तर दीपक जयसिंग राजपूत (वय ३२, दहिसाथ, अमरावती) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवप्रसाद हा मनोरुग्ण होता आणि त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू असल्याने आई लक्ष्मीबाई त्याच्यासह नागपुरच्या महाल परिसरात त्यांच्याच घरात राहत होती. चार महिन्यांपूर्वी लक्ष्मीबाई आजारी पडल्यामुळे त्यासुद्धा अमरावतीत राहायला आल्या. त्यामुळे शिवप्रसाद नागपुरात एकटा होता.२४ जानेवारी सायंकाळी शिवप्रसाद अमरावतीला आला. रात्रीच्या सुमारास शिवप्रसादने आईसोबत वाद घातला. मला खामगाव भागातील आमदाराच्या मुलीसोबत लग्न करून दे, गाडी घेऊन दे,’ अशी मागणी त्याने सुरू केली. यातच रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याने स्वयंपाकखोलीतून चाकू आणून आईवर वार केला. दीपकने अडवताच शिवप्रसादने त्याच्यावरही वार केला. दीपकने चाकू हिसकावला, पण शिवप्रसादने त्याच्या करंगळीचा चावा घेत दोन तुकडे केले. यामुळे संतापलेल्या दीपकने त्याच चाकूने शिवप्रसादच्या पाठीवर, मानेवर वार केला व तिथे पडलेल्या कडप्पाने त्याच्या डोक्यावर घालून त्याला ठार केले. त्यानंतर बाजूच्या खोलीत मृतदेह नेऊन टाकला. २४ तास याची कुणालाही कुणकुण लागू दिली नाही व २४ जानेवारीच्या मध्यरात्री पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून दिला.

शिवप्रसादचा मृतदेह जाळून टाकल्यानंतर दीपक स्वत:च खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने हा प्रकार सांगताच खोलापुरी गेट पोलिसांनी ठाण्यापासून अवघ्या दीडशे मीटरवर असलेल्या राजपूतच्या घरी धाव घेतली. त्या वेळी शिवप्रसादचा मृतदेह जळतच होता. पोलिसांनी आग विझवून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.