चिंता करू नका, पवार कुटुंबीय तुमच्यासोबत; रोहित पवारांची आर.आर आबांच्या मुलाला ग्वाही

0
1745

सांगली, दि. २८ (पीसीबी) – रोहित दादा तुम्ही आम्हाला परके समजू नका. आर.आर  आबांच्या पश्चात पवार कुटुंबीयांनी तुमच्या कुटुंबियांची सर्व जबाबदारी  घेतली  आहे. तुम्ही माझे लहान भाऊच आहात. केवळ शिक्षणापुरती जबाबदारी घेतलेली नाही, तर या पुढच्या काळातही आम्ही सर्व पवार कुटुंबीय तुमच्यासोबत आहोत. तुम्ही कोणतीही चिंता करू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आश्वस्त केले.   

दिघंची येथे युवा राष्ट्रवादी काँग्रेसने युवा शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.  त्यासाठी रोहित पवार आणि रोहित पाटील  दिघंचीला आले होते. या मेळाव्याला येताना अंजनी ते दिघंची या प्रवासात रोहित पवार यांनी रोहित पाटील यांच्या वाहनाचे सारथ्य केले.

रोहित पवार बानुरगड येथे उमाजी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अंजनीला गेले. तेथे आर. आर. पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर रोहित पाटील यांच्या गाडीच्या चालकाच्या सीटवर बसले. तसेच  शेजारी रोहित पाटील यांना बसवले. तेथून ते आरेवाडी येथे आले. येथे बिरोबाचे दर्शन  घेऊन तेथून दिघंची येथे रवाना झाले.