राजेंद्र घावटे लिखित “चैतन्याचा जागर” ला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार..

0
31

राजेंद्र घावटे यांनी लिहिलेल्या “चैतन्याचा जागर” या पुस्तकास येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा “राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार” जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण चार जून रोजी शिर्डी येथे होणार आहे. राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल महाराष्ट्र व कामगार दिनाच्या दिवशी जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ व संपादक प्रशांत वाघ यांनी कळविले आहे.

शिवाबाबावाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता.येवला, जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- ४७ , कथा संग्रह-१७, कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह- ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या.

प्राप्त कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एका कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ललित लेखनासाठी पिंपरी चिंचवडचे लेखक राजेंद्र घावटे यांच्या “चैतन्याचा जागर” या ललित लेख संग्रहाला, गंगापूर, जि. छ. संभाजीनगरचे कवी संतोष आळंजकर यांच्या “हंबरवाटा” या कवितासंग्रहाला, टेंभुर्णी, जि सोलापूर येथील हरिश्चंद्र पाटील यांच्या “ओवाळणी” या कथासंग्रहाला, आणि पुणे येथील लेखक देवा गोपीनाथ झिंजाड यांच्या “एक भाकर तीन चुली” या कादंबरीला सर्वोत्कृष्ट साहित्य कलाकृतींचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. चारही पुरस्कारांच्या निवडीसाठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी परिक्षण केले आहे.

“चैतन्याचा जागर” या विचारसंग्रह ग्रंथाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक वै. डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रस्तावना तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा शुभसंदेश लाभला आहे. संवेदना प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले आहे