देशात पंधरा दिवसांत कोरोनाचे रुग्ण एक लाखावरून दोन लाखावर

0
289

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – देशातील कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी या संख्येने २ लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखावरून २ लाखांवर गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने इडियाने टुडेने हे वृत्त दिले आहे. देशात पहिला रुग्ण केरळमध्ये ३० जानेवारी रोजी आढळला होता. कोरोना व्हायरसचे केंद्र ठरलेल्या वुहानमधून परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हा व्हायरस आढळला होता. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली. १० मार्चला भारतात ५० करोना रुग्ण होते. त्यानंतर सुरू झालेली कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ अद्याप थांबलेली नाही.
१८ मे रोजी ही संख्या १ लाखांवर पोहोचली होती. म्हणजेच देशात ११० दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एकावरून एक लाखावर गेली होती. आता गेल्या पंधरा दिवसांत या एक लाख रुग्णांमध्ये आणखी एक लाख रुग्णांची भर पडली आहे.
रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोना व्हायरसचा प्रसार कमी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा फायदा होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. शिवाय देशातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.