सह्यांद्री किंग्ज् संघ उपांत्य फेरीत; शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाचा सलग दुसरा विजय !!
पुणे, 15 पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत सह्यांद्री किंग्ज् संघाने सलग चौथा विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाने सलग दुसरा विजय मिळवून आगेकूच केली.
हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत यश जाधव याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाने सोनीगरा सुपरकिंग्ज् संघाचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सोनीगरा सुपरकिंग्ज् संघाने २० षटकात १०० धावा धावफलकावर लावल्या. राजेश पवार (३७ धावा) आणि गोरक्ष जाधव (२० धावा) यांनी धावांचे योगदान दिले. गणेश कलाल, क्षितीज अगरवाल आणि रणवीर सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. हे लक्ष्य शेट्टी बंन्ट् वॉरीयर संघाने १८.१ षटकात पूर्ण केले. ऋषी बारणे (नाबाद ३० धावा), यश जाधव (२१ धावा) आणि पारस चव्हाण (नाबाद १७ धावा) यांनी धावा जमवून संघाचा विजय निश्चित केला.
सुशांत अभंग याने केलेल्या ५८ धावांच्या जोरावर सह्यांद्री किंग्ज् संघाने मोरे पाटील पॅकर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा खेळणाऱ्या मोरे पाटील पॅकर्सने २० षटकात १५० धावांचे लक्ष्य उभे केले. तिलक जाधव याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ९२ धावांची खेळी केली. हे लक्ष्य सह्यांद्री किंग्ज् संघाने १८.३ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. सुशांत अभंग याने ३४ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ५८ धावांची खेळी केली. बालाजी महानवर (३० धावा) आणि गिगी खोखर (नाबाद ३० धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय सोपा केला.
याआधी, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीशभाई शेट्टी यांच्या मातोश्री प्रफुल्ला शंकर शेट्टी यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. सामना सुरू होण्याआधी खेळाडूंनी कै. प्रफुल्ला शेट्टी यांना श्रद्धांजली वाहीली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सोनीगरा सुपरकिंग्ज्ः २० षटकात १० गडी बाद १०० धावा (राजेश पवार ३७, गोरक्ष जाधव २०, गणेश कलाल २-१२, क्षितीज अगरवाल २-२८, रणवीर सिंग २-१३) पराभूत वि. शेट्टी बंन्ट् वॉरीयरः १८.१ षटकात ६ गडी बाद १०२ धावा (ऋषी बारणे नाबाद ३०, यश जाधव २१, पारस चव्हाण नाबाद १७, गौरव जोत्शी २-१४); सामनावीरः यश जाधव;
















































