दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार; तणावग्रस्त परिस्थिती

0
359

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. मात्र,  दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. यावेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असून शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

आज (मंगळवारी) सकाळी या मोर्चा दिल्लीत धडकला. दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. मोर्चा रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मोर्चेकरी येताच पोलिसांनी त्यांना रोखले. जमाव आक्रमक असल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकऱ्यांवर पाण्याचा माराही करण्यात आला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

दरम्यान, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, दीडपट हमीभाव, कर्जमाफी, वीज दरकमी करणे, या मागण्यांसाठी भारतीय किसान युनियनने ‘किसान क्रांती यात्रा’ काढली आहे. २३ सप्टेंबरला हरिद्धारमधून ही यात्रा काढण्यात आली असून  सोमवारी (दि.१)  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून मार्ग निघालेला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली. या मोर्चात ५० हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. आज (मंगळवार) दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होणार होता.