दसरा मेळाव्यामुळे मुंबईत 5 ते ६ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी

0
141

मुंबई दि.२ (पीसीबी): दसऱ्याला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्या निमित्ताने शिंदे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा मातोश्री निवासस्थापासून जवळच असलेल्या बीकेसी मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाने या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. शक्तीप्रदर्शन करण्याच्या हिशोबानेच दोन्ही गटाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईत गर्दीचं वादळ घोंघावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांपासून ते वाहतूक पोलिसांनीही गर्दीला आवर घालण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जोरदार तयारी केली आहे. दोन्ही मेळाव्याच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांकरीता पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहे. दादरचा पश्चिमेचा भाग, माहीम, माटुंगा, सेनापती बापट चार रस्ता हे परिसर वाहन पार्किंगसाठी निश्चित करण्यात आले आहेत. तर या पार्किंग स्थळापेक्षा वाहन जास्त झाली तर दादर स्थानका जवळील महाराष्ट्र कामगार मंडळाचे मैदानही पार्किंग स्थळ म्हणून वापरण्यात येणार आहे. कामगार मंडळाच्या मैदानात साफसफाई सुरू झाली असून मैदानातील गवत कापणी सुरू आहे.

ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी १५०० ते २००० वाहन येतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबईकरांना वाहतुकीचा सामना करावा लागणार नाही याची तयारी ही मुंबई महापालिका आणि वाहतूक विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे शिंदे गटाच्या मेळाव्यालाही प्रचंड गर्दी होणार आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वाहने येणार असल्याने या वाहनांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीची सूट मिळणार आहे.

पिण्याच्या पाण्याचे टँकर, पेट्रोल-डिझेल आणि केरोसीनचे टँकर, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमसरकारी वाहने, शाळेच्या बसेस आणि दसरा मेळाव्यासाठी येणारी प्रवासी वाहने व खाजगी बसेस यांनाही या बंदीतून सूट देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.