थेरगाव सोशल फाउंडेशनचा 41 कुटुंबांना मदतीचा हात

0
387

पिंपरी, दि. 8 (पीसीबी): निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी लोणावळा येथे थेरगाव सोशल फाउंडेशनचे युवक सरसावले आहेत. ते संकटात सापडलेल्या ग्रामस्थांसाठी देवदूतच ठरले आहेत. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले राजमाची, वन्हाटी, फणसराई व उढेवाडीमध्ये जवळपास 41 कुटुंबांना मदतीचा ‘होम टू होम’ हात या युवकांनी दिला आहे.  

थेरगाव येथील सोशल फाउंडेशनच्या युवकांनी रविवारी (ता. 7) थेट संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी लोणावळा गाठले. यामध्ये त्यांना अन्नधान्य व घरगुती सामान दिले आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट व बिस्कीट देण्यात आले. सकाळी साडे आठ वाजता हे युवक लोणावळ्यात पोचले होते.

चिखल व अद्यापही पडलेली घरे सावरण्यातच नागरिक व्यस्त असल्याचे पाहून सोशल फाउंडेशनच्या युवकांचे डोळे पाणावले. तसेच लांब पल्ल्याहून अद्यापपर्यंत कोणाचीही मदत मिळाली नाही. मात्र, सर्व युवक देवदूतासारखे धावून आल्याने ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले. युवकांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच संकटावर मात करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केले.