थेरगावमध्ये घरफोडी; २ लाख ९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

770

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटूंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २ लाख ९ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सोमवार (दि.१२) पहाटे तीन ते मंगळवार (दि.१३) दुपारी तीनच्या दरम्यान थेरगाव येथील शिवतीर्थनगर येथील सुंदर कॉलनीतल्या घरात घडली.

याप्रकरणी दत्तात्रय कृष्णदेव शेरखाने (वय ३४, रा, सुंदर कॉलनी, शिवतीर्थनगर थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शेरखाने कुटूंबीय देवदर्शनासाठी शिर्डी, शनिशिंगणापुर आणि वणीदेवी येथे थेरगावातील घराला कुलूप लावून गेले होते. यावेळी सोमवार (दि.१२) पहाटे तीन ते मंगळवार (दि.१३) दुपारी तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ९ हजारांचा ऐवज चोरुन नेला. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.