…तर १ जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार

0
2564

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – सध्याचे मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य  नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने २०१५ मध्येच जुने एटीएम, डेबिट कार्ड  ईएमव्ही मध्ये बदलून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता जुने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड ३१ डिसेंबरपर्यंत ईएमव्ही कार्डमध्ये बदलून न घेतल्यास १ जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद केले जाणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

ईएमव्ही  स्मार्ट पेमेंट कार्डमधील  मॅग्नेटिक स्ट्राईप्सच्या जागी इंटिग्रेटेड सर्किटमध्ये डेटा स्टोअर होतो. या कार्डला चिप कार्ड आणि आयसी कार्ड असेही म्हटले जाते. या कार्डद्वारे जितक्या वेळेस व्यवहार केला जाईल, तितक्या वेळेस डायनामिक डाटा तयार केला जातो. या कार्डचा  बनावट कार्ड बनवता येत नाही.तसेच त्याची कॉपीही करता येत नाही. त्यामुळे एटीएम कार्डसंबंधी  फसवेगिरीला आळा बसून ग्राहकांना फायदा होणार आहे.

कार्ड ब्लॉक होणार आहे की नाही, हे पाहण्यासाठी सर्वप्रथम चिप तपासून पहा. त्यासाठी तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या उजव्या बाजूला ईएमव्ही चिप आहे की नाही हे पाहावे लागेल. जर कार्डच्या उजव्या बाजूला त्यावर सिमकार्ड सारखी चिप असेल, तर कार्ड ब्लॉक होणार नाही. तसेच अशी चिप नसल्यास कार्ड जुने असून, ते कार्ड ३१ डिसेंबरपर्यंत ब्लॉक होणार आहे, असे समजावे.

कार्ड बदलण्यासाठी संबंधित बॅंकाच्या शाखेत संपर्क करुन इंटरनेट बॅंकिंगच्या सहाह्याने ईएमव्ही कार्ड मिळवता येईल. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कार्ड घर पोहोचही मिळण्याची सोय करण्यात आली आहे,  त्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.