…तर पुन्हा लॉकडाऊन – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0
517

पुणे, दि. ७ (पीसीबी) :राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता काही भागात लॉकडाऊन शिथिल केला आहे . मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.

पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शहरात आणि जिल्ह्यात अनेक नागरिक नियमांचं उल्लंघन करत विनाकारण खुलेआम फिरत आहेत. बरेच नागरिक कोणत्याही कारणाशिवाय मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा इशारा दिला आहे.

“पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 20 दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे लागणार आहे”, असं नवल किशोर राम यांनी सांगितलं.

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागात नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्नसमारंभात नियमांचे पालन न करता गर्दी होताना दिसून येत आहे. त्यादृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल”, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजार 996 वर पोहोचला आहे. यापैकी 13 हजार 971 रुग्ण बरे झाले आहेत. तर 889 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 14 हजार 106 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मात्र, पुण्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुणे शरात ८०० तर आता पिंपरी चिंचवड शहरात ५५० च्या सरासरीने रुग्णवाढ सुरू झाली आहे. हा सर्वांसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाबाबत उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 4 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडाआयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषिआयुक्त सुहास दिवसे यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.