पुणे शहरात दोन खासदार, चार आमदार क्वारंटाईन, सहा नगरसेवकांना बाधा

0
480

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुण्यात महापौर मुरली मोहळ यांच्या पाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शेजारी पिंपरी चिंचवड शहरात एक आमदार आणि सहा नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

“मला ताप आला होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी केली. त्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. आता माझी तब्येत ठिक आहे आणि माझ्यावर उपचार सुरु आहेत”, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले होते.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरळीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते.