डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ उत्साहात साजरी

0
1006

औंध, दि.३ (पीसीबी) – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचा, पश्चिम विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या, पश्चिम विभागीय समन्वयक समितीच्या सदस्य मा. सौ.रूपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. पश्चिम विभागीय अध्यक्ष मा.अड. राम कांडगे, विभागीय अधिकारी मा.किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी मा. एस. टी. पवार,  चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री.व्ही.टी. पिंगळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा.सौ. रूपालीताई चाकणकर म्हणाल्या भारतीय स्त्रीमुक्तीच्या पहिल्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या  मुख्याध्यापिका तसेच समाजप्रबोधक म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांना ओळखतो. सावित्रीबाई फुले या विज्ञानवादी विचारांच्या असल्याने समाजातील रूढी, परंपरांना आणि अंधश्रद्धांना त्यांनी विरोध केला. कोणत्याही स्त्रीच्या पाठीमागे ज्योतिबा फुलेंसारखा पुरुष खंबीरपणे उभा असेल तर सावित्रीची लेक कोणत्याही संकटावर मात करून विजय मिळऊ शकते. त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी अंगात सळसळते रक्त ठेवावे आणि जिजाऊ आणि सावित्रीचा वारसा चालवावा. १९८३ शाली मा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी पहिल्यांदा महिला धोरण राबविले. त्यामुळे आज अनेक स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविताना  दिसत आहेत. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांचे विचार आपण आत्मसात करून वाटचाल करावी. असे आवाहन  त्यांनी केले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा.अँड. राम कांडगे म्हणाले की, सावित्रीबाई फुले या विश्वातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी स्त्री मुक्तीची वाट सर्वसामान्य स्रीयांसाठी मोकळी केली. तसेच महात्मा ज्योतीराव  फुले यांच्या कार्याला त्यांनी बळ दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की,  अज्ञान, अंधकार, धर्मभोळेपणा अशा अनेक रुढी परंपरांमध्ये अडकून पडलेल्या स्त्रियांना आत्मभान देण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा. अशा उद्देशाने हा जयंती सोहळा घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी व इंग्रजी विभागाने तयार केलेल्या ‘अक्षररंग’ भित्तिपत्रिकांचे तसेच ‘स्त्री विशेषांकाचे’ अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मराठी विभाग व विद्यार्थी मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पुणे शहरातील १७० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.राजेंद्र थोरात, डॉ.निशा भंडारी, डॉ.सविता पाटील यांनी काम पाहिले. संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्पर्धेचे कार्याध्यक्ष आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर, विद्यार्थी मंचचे समन्वयक सूर्यकांत सरवदे व विद्यार्थी म्हणजेच सर्व सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर व भक्ती पाटील यांनी केले. आभार मा.श्री.एस.टी. पवार यांनी मानले.