जे ५५ वर्षात झाले नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवले – निर्मला सीतारामन

0
313

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या निमित्ताने प्रथमच महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी एक ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यास ५५ वर्ष लागली, पण आम्ही फक्त पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स त्यात जोडले असे सांगितले.

यावेळी निर्मला सीतारामन यांनी पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला. तसेच या वर्षातच तीन ट्रिलियन डॉलरचे लक्ष आपली अर्थव्यवस्था गाठेल असेही सांगितले. पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पण आता भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करताना जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. भारताच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे. नव्या भारताचा हा अर्थसंकल्प आहे असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. स्थिर आणि प्रगतीशील भारतासाठी हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचे ध्येय गाठणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केली.