दारूच्या बाटलीवर महात्मा गांधींचा फोटो; भारतीयांच्या रोषानंतर कंपनीचा माफीनामा

0
589

इस्त्राइल, दि. ५ (पीसीबी) – दारूच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो लावल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीयांच्या रोषानंतर कंपनीने माफी मागितली आहे. इस्त्राइलमधील ताफेन औद्योगिक क्षेत्रातील माका ब्रेवरी या कंपनीने दारूच्या बाटलीवर चक्क महात्मा गांधींचा फोटो लावला होता.

इस्त्राईलच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या दारू उत्पादनाची निर्मीती करण्यात आली होती. त्यामधील काही बाटल्यावर महात्मा गांधींचे छायाचित्र लावण्यात आले. सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर यासर्व प्रकाराबाबत इस्त्राइल कंपनीने भारतीयांची भावना दुखवल्या बाबत माफी मागितली आहे. इतकेच नव्हे तर आम्हीही महात्मा गांधी यांचा सन्मान करतो, बाटल्यांवर महात्मा गांधी यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही माफी मागत आहोत, असेही कंपनीने म्हंटले.

दारूच्या बाटलीवर महात्मा गांधींचा फोटो आढळल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यावर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी नवी दिल्लीत निषेध केला होता. इतकेच नव्हे तर या संदर्भात कारवाई करण्याची मागणीही केली होती.