व्यापाऱ्यांना अवघ्या ५९ मिनिटात १ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार

0
451

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – केंद्रीय अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या छोट्या उद्योगांना आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या छोट्या उद्योगांसाठी अवघ्या ५९ मिनिटात १ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

कृषी अर्थव्यवस्थेप्रमाणेच छोट्या उद्योगांकडेही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. लघू उद्योजकांच्या कर्जात वाढ करण्यासाठी कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस बँकांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार लघू उद्योगांसाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सीडबी, भारतीय स्टेट बँकेसहीत २१ राष्ट्रीय बँकांमधून हे कर्ज वितरीत केले जाणार आहे.

सध्या सुरू असलेल्या उद्योगांसाठीही ही योजना लागू राहणार आहे. तसेच लवकरात लवकर नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांसाठीही ही योजना सुरू राहणार आहे. एमएसएमई सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने नोकऱ्यांचीही निर्मिती होणार आहे. कालच सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वे पाहणी अहवालातही एमएसएमईवर जोर देण्यात आला होता.