जुन्या कामगाराने चोरले एक लाखांचे टॉवरचे डिवाइस

0
229

चाकण, दि. १५ (पीसीबी) – पूर्वी काम करत असलेल्या एका कामगाराने कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेले एक लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीचे टॉवरचे सात डिवाइस चोरून नेले. ही घटना 12 जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खराबवाडी येथील एका टॉवर जवळ घडली.

सचिन शिवाजी येडे (रा. शिंदे वस्ती रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत वैभव पुंडलिक हाडके (वय 41, रा. जुनी सांगवी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रोलाईन डेटा टेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतात. कंपनीची खराबवाडी येथे जागा असून त्या जागेत टॉवर आहे. आरोपीने टॉवरमधून 1 लाख 2 हजार पाचशे रुपये किमतीचे सात वेगवेगळे डिवाइस चोरून नेले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री झाल्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत गुन्हा नोंदवला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.