जीवनशैलीत बदल करा – श्रावण हर्डीकर

0
475

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोरोनाची साखळी तोडणे आवश्‍यक असून या व्हायरसवर प्रभावी उपायकारक औषध अथवा लस उपलब्ध नसल्यामुळे पुढील किमान तीन ते सहा महिने कोरोना आपल्यासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे जीवनशैलीत बदल करून कोरोनासोबतच जगावे लागेल, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

आयुक्तांच्या कक्षात ते पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, कोरोना हा व्हायरस डेंजर नाही. आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी केवळ 2 टक्के लोकांनाच त्याचा जास्त फटका बसला आहे. पाच टक्के लोकांमध्ये या रोगाची अधिक लक्षणे आढळली आहेत मात्र हे रुग्ण इतरही आजाराने यापूर्वीच बाधित ठरले आहेत. तर केवळ 15 टक्के लोकांना या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. उर्वरित 78 ते 80 टक्के लोकांना या आजाराची कोणतीच लक्षणे आढळून येत नाहीत. काळजी आणि प्रशासनाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास त्याच्यावर मात करणे शक्‍य आहे.
काटकसरीवर यापुढे भर
राज्यशासनाचे खर्चात काटकसर करण्याचे आदेश दिल्यामुळे महापालिकेच्या मुख्य लेखापालांच्या नियंत्रणाखाली आर्थिक समिती नियुक्त करण्यात आली असून कोणत्या-कोणत्या बाबींमध्ये काटकसर करणे शक्‍य आहे, त्याचा अहवाल तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे. कोरोना आणि इतर बाबींचा विचार करता पालिकेला आर्थिक स्वयंशिस्त लावण्याबरोबरच काटकसर करावी लागेल, असेही आयुक्त म्हणाले.
काय सुरू काय बंद राहणार
येत्या 3 मे रोजी केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन संपुष्टात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात काय सुरू करता येईल आणि काय बंद ठेवावे लागेल याबाबत पडताळणी करून अहवाल तयार केला जात आहे. प्रत्येक्ष क्षेत्र खुले करणे शक्‍य नसले तरी अर्थव्यवस्था आणि नागरिकांचा विचार करून काही क्षेत्र खुली करावी लागणार आहे. जास्त रिस्क नसलेली आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ठरविलेले निकष ज्या ठिकाणी पाळले जातील, ती क्षेत्र खुली करण्याचा विचार आहे. त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
एकाच इमारतीमधील नागरिक
रुपीनगर परिसरात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांबाबत विचारले असता आयुक्त म्हणाले, जे रुग्ण सापडले आहेत ते अत्यंत गर्दीच्या परिसरातील आहेत. एकाच इमारतीमध्ये रहात असलेल्या पाच ते सहा कुटुंबांना कोरोनाची बाधा झाली आहे. रुपीनगरच्या इतर क्षेत्रांमध्ये रुग्ण सापडलेले नाहीत. जे रुग्ण आढळून आले आहेत ते सर्व बाधित रुग्णाच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट’मधील आहेत.

कोरोनाला रोखण्यात यश
महापालिकेच्या उपाययोजनांमुळे कोरोनाची गती रोखण्यात आपल्याला यश आल्याचा दावा आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, प्रशासन घेत असलेले निर्णय, बाधित आणि त्यांच्या हाय, लो कॉन्टॅक्‍ट रिस्कबाबत पडताळणी करून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वेक्षण व इतर बाबींमुळे तसेच कठोर उपाययोजना केल्यामुळे कोरोनाला काही प्रमाणात अटकाव करण्यात यश आले आहे. नागरिकांनी अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर पडत असाल तर मास्कचा वापर करावा, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना अवलंब केल्यास आपण कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, असा दावाही आयुक्तांनी यावेळी केला.