पिंपरी चिंचवड शहरात नवीन ११ रुग्ण, संख्या पोहोचली 107 वर

0
472

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – शहरातील कोरोनाबाधितांचे संक्रमण कमी होण्याऐवजी गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत असून, आज पुन्हा शहरात 11 रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे हे यातील आठ रुग्ण रुपीनगर परिसरातील आहेत. तर उर्वरित तिघेजण खडकी कॅन्टोन्मेंट व पिंपळे निलख परिसरातील आहेत. बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट’मध्ये आल्यामुळे या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असून, एकूण रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे.

शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 12 मार्च रोजी सापडला होता. तो परदेशवारी करून आलेल्या व्यक्तींमधून आढळून आला होता. यानंतर 12 ते 17 मार्च या कालावधीत 12 रुग्ण आढळून आले होते. 17 मार्चनंतर रुग्णांची संख्या कमी होऊन 28 मार्चपर्यंत 11 जण कोरोनामधून मुक्त झाले होते. शहर करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असतानाच तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यामध्ये सातत्याने संक्रमण वाढतच गेल्यामुळे आज बाधित रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे 12 मार्च ते 17 एप्रिल या 35 दिवसांच्या कालावधीत पहिले 51 रुग्ण आढळले होते. तर 18 मार्च ते 28 मार्च या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत नवे 55 रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा शहरातील वेग दहा दिवसांवर पोहोचली आहे. मंगळवारी सकाळच्या टप्प्यात (सोमवारी रात्री साडेसहा ते मंगळवार सकाळी 11 वाजेपर्यंत) 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. 16 ते 34 या वयोगटातील पुरुष असून 15 ते 19 या वयोगटातील तरुणींचा समावेश आहे. यातील 6 पुरुष आणि 2 महिला या रुपीनगर, निगडी परिसरातील असून एक पुरुष हा खडकी येथील रहिवासी आहे. या सर्वांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारच्या टप्प्यात आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका 53 वर्षीय पुरुषाचा तर 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील एकजण पिंपळे निलख तर दुसरा खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 107 वर पोहोचली आहे. हे सर्वजणही यापूर्वी बाधित असलेल्या रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट’मध्ये आल्याने या रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात गेल्या चोवीस तासांत 11 कोरोना बाधितांची भर पडली आहे.

आजपर्यंत महापालिकेच्या वतीने 2378 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यापैकी 2102 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 179 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर आज दोघजण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडले असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या 31 झाली आहे. तर चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघेजण महापालिका हद्दीतील असून एकजण पुणे शहरतील आहे. तसेच 242 संशयित व बाधितांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात संशयित मात्र अहवाल निगेटिव्ह आलेल्या व करोनामुक्त झालेल्या दोघांसह 156 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात 56,283 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले.