जामा मशिद तोडा, तेथे हिंदू देवतांच्या मूर्त्या नाही सापडल्या, तर मला फासावर लटकवा – साक्षी महाराज

0
652

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – जेव्हा मी राजकारणात आलो होतो, तेव्हा माझी पहिली घोषणा होती की, अयोध्या-मथुरा-काशी सोडा, दिल्लीची जामा मशिद तोडा. ही मशीद तोडल्यानंतर येथे हिंदू देवतांच्या मुर्त्या सापडल्या नाहीत, तर मला फाशीवर लटकवा, अशा वादग्रस्त विधानाचा भाजप नेते साक्षी महाराज यांचा  एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात  व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्याचे खासदार साक्षी महाराज यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून दिली आहे. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांचा  त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते दिल्लीतील जामा मशिद उद्ध्वस्त करण्याबाबत बोलत आहेत. गुरुवारी (दि. २२)  एका जाहीर कार्यक्रमातील हा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, या  कार्यक्रमात साक्षी महाराजांनी आजच्या पिढीच्या कथावाचकांवर टीका केली होती.  देशात असे कथावाचक आहेत ज्यांना श्रीमद भागवत कथेतील क, ख, ग ही माहिती नाही. स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी आजच्या कथावाचकांना त्यांनी सल्लाही दिला होता. राजकारणात येण्यापूर्वी आपण कथाकथन आणि प्रवचने देण्याचे काम करत होता, असे त्यांनी यावेळी सांगितले.