राम मंदिरावरुन मतांचे राजकारण नको; हिंदुत्व उद्देश असेल तरच भाजपासोबत – मनोहर जोशी

0
479

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – हिंदूंनी एकत्र यावे हा आमचा उद्देश स्पष्ट आहे. याद्वारे हिंदुस्तानाचे नाव सार्थ व्हावे असे आम्हाला वाटते. राम मंदिरावरुन मतांचे राजकारण होता कामा नये, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर एकत्र येणार असेल तर आम्ही भाजपासोबत जाऊ, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवेसनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी म्हटले आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी सहपरिवार अयोध्येकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, ते पत्रकारांशी बोलत होते.

मनोहर जोशी म्हणाले, आज ठाकरे कुटुंबीय चांगल्या कामासाठी बाहेर पडले आहेत, त्यांना यश मिळो हीच प्रभू रामचंद्राकडे आमची प्रार्थना आहे. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. मी १९९२ मध्ये अयोध्येला गेलो होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीही मला सेनाभवनातून असाच निरोप दिला होता.

उद्धव ठाकरे चांगलं पाऊल टाकत आहेत ते यात नक्कीच यशस्वी होतील, त्यांना हिंदुत्व कधीच मारक ठरणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल. आजकल जशी हवा आहे तसे लोक मतदान करतात. राजकारणात कोणाचीही मक्तेदारी नसते. त्यामुळे यंदा मतदारांचं मतपरिवर्तन जरूर होईल, लोक विचार करतील आणि शिवसेनेला पाठींबा देतील, असा विश्वासही यावेळी मनोहर जोशींनी व्यक्त केला.