जसप्रीत बुमराहचे ‘प्रेमम’ जडले; अभिनेत्री अनुपमासोबत अफेअरची चर्चा

0
683

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – क्रिकेट आणि मनोरंजन विश्वाचे नाते नवीन नाही. शर्मिला टागोर-पतौडींपासून हरभजन-गीता, विराट-अनुष्का अशी असंख्य उदाहरणे सापडतील. काही जोडपी विवाहबंधनात अडकली, तर काहींचे जुळता-जुळता राहून गेले. क्रिकेटच्या विश्वातील एका उगवत्या ताऱ्याचेही एका अभिनेत्रीशी प्रेम जुळल्याची चर्चा आहे. किंबहुना ‘प्रेमम्’ जडले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. टीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरमसोबत अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

जसप्रीत बुमराह सध्या आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. २५  वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूसाठी स्टेडियममध्ये बसलेल्या फॅन्सकडून ‘माझ्याशी लग्न कर’ असे फलकही झळकावले जातात. मात्र जसप्रीतचा जीव जडला आहे, तो अभिनेत्री अनुपमावर. ‘प्रेमम’ या मल्ल्याळम चित्रपटामुळे अनुपमा प्रकाशझोतात आली.

जसप्रीत आणि अनुपमा यांनी ट्विटरवर एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केल्यानंतर चाहत्यांच्या माना वळल्या. अनुपमाने मात्र या अफवांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. बुमराहचे नाव यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नासोबतही जोडले जात होते. मात्र तिनेही या अफवा धुडकावून लावल्या होत्या.