जयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका

0
232

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राज्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी सर्व आमदार विधानसभेत दाखल झाले. हे आवाजी मतदान घेण्यात आले. या मतदानापूर्वी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार व्यक्त करत खोचक टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत मागील एका वर्षापासून अध्यक्षपदाची जागा भरायची होती. त्यासाठी आम्हा महाविकास आघाडीचे नेते वारंवार जाऊन राज्यपालांना भेटलो. त्यांना या पदाची निवडणूक लावावी अशी विनंती केली होती. मात्र राज्यपाल वारंवार कारणे देऊन टाळत होते. दुसरे सरकार सत्तेवर येताच विधानसभेची निवडणूक लावली, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने विनंती करूनही ते ऐकत नव्हते. ते का परवानगी देत नव्हते हे आता आम्हाला कळाले आहे. राज्यपालांनी कसे काम करावे याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. त्यांनी या मागील कारण आधीच सांगितले असते तर बरे झाले, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीने 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठविली आहे. या यादीत त्यांनी कोणताही बदल न करात. आमच्या यादीतील 12 ही आमदारांची नावे मंजूर करावीत, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटलांच्या या भाषणाने विधानसभेत एकच हशा पिकला.