चिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला अटक

0
2016

चिखली, दि. १४ (पीसीबी) – पाणी पिण्याच्या बहाण्याने एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी अकराच्या सुमारास चिखली, मोरे वस्ती येथे घडली.

याप्रकरणी पीडित २० वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दादा मोहन पिसाळ (वय २६, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखळी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मोरेवस्ती परिसरात राहाणाऱ्या २० वर्षीय तरुणीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी दादा पिसाळ पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आला. पाणी पिऊन होताच त्याने तिचा हात धरुन, “तु मला खुप आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे बोलून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालाही काही सांगितल्यास तिच्या होणाऱ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी दादा पिसाळ याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.