चिंचवड लढणारच, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार, भाजप विरोधात तयारी

0
219

– घड्याळ चिन्हावर निवडणूक लढाविण्याचा ठराव, संघटना आक्रमक

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक जिंकायचीच असा निर्धार केला असून सर्व कार्यकर्ते पुढचे महिनाभर दिवसरात्र मेहनत घ्यायला सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सक्षम दावेदारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आणि एक औद्योगिक केंद्र असलेल्या चिंचवड मतदासंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार करण्याची संधी सोडू नये, असा ठराव पक्ष संघटनेने एकमताने पारित केला आहे.

संपूर्ण शहरात कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि नेतेमंडळी देखील आक्रमक आहेत. संपूर्ण शहरात गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘एक्शन मोड’मध्ये असल्याने, ही निवडणूक घड्याळ याच चिन्हावर लढविण्यात यावी अशी मागणी होत आहे.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी, ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम म्हणून बघायला पाहिजे, तसेच आपले पक्ष संघटन मजबूत असून बूथ स्तरीय तयारी झाली असल्याचे म्हटले. शहरात आरएसएसचे प्राबल्य वाढत असल्याने या गोष्टींना अटकाव घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही नमूद केले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी, एक महीना आपल्याला घरी जायचे नाही आणि विजयश्री खेचून आणायची आहे असे म्हणत सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. आता कोणाची भीतीही नाही आणि सहानुभूतीही नाही, असे प्रतिपादन केले.

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका जिंकण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून, चिंचवडमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

तर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मागच्या १० वर्षात राष्ट्रवादीचा आणि अजित दादांनी केलेल्या कामाचा फायदा घेऊन पक्षाचे नुकसान करताना कोणी विचार केला नाही. आता पक्षाने देखील कुणाचा विचार करायची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडले.

शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी देखील ही निवडणूक लढविण्यात यावी अशी भावना बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनी उस्फूर्त भावना व्यक्त करत ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची मागणी केली आहे. तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा करत ही निवडणूक आपण जिंकू असा संकल्प केला आहे.

चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार असणे हे येत्या महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहे. तसेच याठिकाणी निवडणूक झाल्यास कुठल्याही इतर पक्षांना ही जागा सोडण्यात येऊ नये. याठिकाणी घड्याळ याच चिन्हावर निवडणूक लढविण्यात यावी. असेही या प्रस्तावात म्हटले आहे.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठी आणि प्रांताध्यक्ष यांच्या पर्यंत घेऊन जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

या बैठकीस राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. अजित गव्हाणे, मा. शहराध्यक्ष महापौर श्री. संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष सौ. कविताताई आल्हाट, राष्ट्रवादी युवक कॅाग्रेस चे शहराध्यक्ष श्री. इम्रान शेख, महारष्ट्र राष्ट्रवादी विध्यार्थी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिल गव्हाणे, चिचवड विधानसभेचे नेते मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, जेष्ठ नगरसवेक श्री. भाऊसाहेब भोईर,शाम लांडे , नगरसवेक श्री. मयुर कलाटे, श्री. विनोद नढे, पंकज भालेकर, मा. नगरसेवक श्री. राजेद्रं जगताप, श्री. अरूण बोऱ्हाडे, ॲड.श्री. गोरक्ष लोखंडे, श्री. राजु लोखंडे, श्री. विनायक रनसुबे, श्री. फझल शेख, श्री. नारायण बहिरवडे, नगरसेविका सौ. मायाताई बारणे, सौ. संगिताताई ताम्हाणे, राष्ट्रावादी युवती अध्यक्ष कु. वर्षाताई जगताप , क्रिडा सेल अध्यक्ष सौ. समिधाताई गोरे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा सौ. संगीताताई कोकणे, विविध सेलचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षसंघटनेचा प्रस्ताव

पिंपरी चिंचवड शहारातील चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक २०२३ जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खालील सर्व पदाधिकारी पक्ष कार्यालयात जमलेले आहोत.

महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष जे सत्तेचं नाट्य सुरू आहे, यामध्ये पुरुगोमी विचाराच्या पक्षांचं, पुरोगामी संघटनांचे आणि कार्यकत्यांचे दमन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न या शहरात हाणून पाडण्यासाठी ही निवडणूक आपल्याला ही एक सुवर्णसंधी आलेली आहे. आपली एकजूट दाखवून नव्या विजयाची नांदी सुरू करण्याची संधी म्हणून याकडे आपण बघायला हवे.

आपला चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. इथे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय अण्णासाहेब मगर, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय रामकृष्ण मोरे सर, आदरणीय अजितदादा पवार यांनी अहोरात्र मेहनत घेऊन पिंपरी चिंचवड शहराचा विकास घडवून आणलेला आहे. इथला बहुसंख्य मतदार हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार आणि आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांचे नेतृत्व मानणारा आहे.

दुर्दैवाने काही अपरिहार्य राजकीय कारणांमुळे मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आपल्याला पराभूत व्हावे लागले. मागील वेळेस, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण बाहेरील उमेदवारास पाठिंबा दिला होता. पण राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच भाजपचे आक्रमक राजकारण पाहता आपण आपला हक्काचा मतदारसंघ कुठल्याही भावनिक कारणामुळे किंवा राजकीय अपरिहार्यतेसाठी इतर पक्षांसाठी सोडू नये. येत्या वर्षभरात महापालिका आणि लोकसभा अशा दोन मोठ्या निवडणुका पार पडणार आहेत, यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पक्षवाढीच्या दृष्टीने ही जागा राष्ट्रवादीने लढवायला हवी, अशी कार्यकर्त्यांची आणि आमची भावना आहे.

पक्ष आणि संघटना म्हणून महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत फॅसिस्ट आणि धर्मवादी राजकारणाचे वादळ घोंगावत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरोगामित्वाची पताका कायम हातात ठेवून चाललेली आहे. आदरणीय फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आपण पुढे घेऊन चाललेलो आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही खालील प्रस्ताव आपणासमोर ठेवत आहोत.

1. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढवावी.
2. ही जागा लढताना ती फक्त आणि फक्त घड्याळ ह्या चिन्हावराच लढावी
3. उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कार्यरत असलेल्याच असावा.

कारण मागील पाच वर्षांमध्ये पक्षाची खूप पडझड झाली आहे. या पडझडीमध्ये सुद्धा पक्षाचे काम करण्यासाठी आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा आणि पुरोगामी विचार यांवर निष्ठा ठेऊन अत्यंत प्रतिकूल काळात पक्षासोबत जी लोक राहिली त्यातील व्यक्तीचा योग्य विचार व्हावा.

निष्ठेचा आणि नियोजनपूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही संधी आपण सोडता कामा नये. जेणेकरून पक्षसंघटनेचा योग्य संदेश तळागाळापर्यंत जाईल. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. म्हणून वरील प्रस्तावावर गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा. शेवटी आपण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घ्याल तो आम्हाला शिरसावंद्य आहेच.