चंद्रकांत पाटील यांच्यावर आता सोलापुरात शाई फेकली

0
397

सोलापूर, दि. १५ (पीसीबी) सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी रात्री सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर निळी शाई फेकण्यात आली. या घटनेमुळे तेथे गोंधळ उडाला. शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ एका संघटनेच्या कार्यकर्त्याने पाटील यांच्या अंगावर निळी शाई फेकल्याची माहिती समोर आली.

पाटील यांच्यावर या पूर्वी चिंचवड येथे शाई फेकण्यात आली होती. तो प्रकार महाराष्ट्रात खूप गाजला. आज सोलापुरात पोलिस बंदोबस्त असताना हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी भीमा इर्मी संघटनेचा म्हणविणा-या अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाला जागेवर ताब्यात घेतले. या घटनेमुळे शासकीय विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. पालकमंत्री पाटील यांचे रात्री सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गेल्या महिन्यात याच शासकीय विश्रामगृहात तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना धनगर आरक्षण कृती समितीचा समन्वयक यांच्या अंगावर शेखर बंगाळे याने धनगर आरक्षण प्रश्नावर लक्ष वेधत निवेदन देताना त्यांच्या डोक्यावर भंडारा उधळला होता.