गोव्यात सत्तास्थापनेचा काँग्रेसचा दावा; शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

0
649

पणजी, दि. १८ (पीसीबी) –  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज ( सोमवारी) दुपारी  काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आमच्याकडे १४ आमदारांचा पाठिंबा  आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.

पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजप सरकार देखील अडचणीत आले आहे. पर्रिकर आणि डिसोझा या दोन भाजप आमदारांचे निधन तसेच दोघांचा राजीनामा यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. त्यात काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत.  काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राज भवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता होणार आहे.  या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस नेते चंद्रकांत कावळेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून आमच्याकडे १४ आमदार आहेत. त्यामुळे  आम्हाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना केली आहे, असे त्यांनी सांगितले.