दापोडीत नाकातोंडातून रक्त येईपर्यंत शिक्षकांकडून विद्यार्थ्याला मारहाण

0
522

दापोडी, दि. १८ (पीसीबी) – अभ्यास कमी करतो, या कारणावरून अकरावी सायन्सच्या वर्गात शिकणारा एका विद्यार्थ्याला दोन शिक्षकांनी नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी आठच्या सुमारास डी टी पाटील ज्युनिअर कॉलेज दापोडी येथे घडली.

अथर्व शशिकांत देशपांडे (वय १७, रा. दापोडी) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार उजागरे सर, जावळे सर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अथर्व दापोडी येथील डी टी पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी सायन्सच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास आरोपी उजागरे सर आणि जावळे सर या दोघा शिक्षकांनी अथर्व याला वर्गाबाहेर बोलावले. तसेच उजागरे याने ‘अभ्यास कमी करतो, तुला माझ्या विषयात शून्य मार्क देतो’ असे म्हणत त्याला दोन कानशिलात लगावल्या. तर जावळे सर याने अथर्वच्या डोक्यावर, तोंडावर, पाठीवर, नाकावर हाताने मारले ज्यामुळे त्याच्या नाकातोंडातून रक्त आले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात या दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काबुगडे तपास करत आहेत.