गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

0
149

आकुर्डी, दि. २० (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने स्वतंत्रपणे दोन कारवाया केल्या. त्यात चौघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. पहिली कारवाई मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे तर दुसरी कारवाई आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ करण्यात आली.

गुंडाराम मांगीलाल सोळंकी (वय २६, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ), कुमार राजू तेवर (रा. सोमाटणे फाटा, मावळ) यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुंडाराम याने त्याच्या घराशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट पाचने कारवाई करून ३९ हजार ७६९ रुपयांचा विमल पान मसाला जप्त केला. त्यात गुंडाराम सोळंकी याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

अमोल वसंतराव भाकरे (वय २८, रा. आकुर्डी), मयंक पाटील या दोघांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल याची आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ सिद्धेश्वर पानवाला नावाची टपरी आहे. त्याने टपरीमध्ये गुटखा विक्रीसाठी ठेवला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून टपरीमधून २३ हजार ६०८ रुपयांचा गुटखा जप्त करून अमोल भाकरे याला अटक केली. त्याने मयंक पाटील याच्याकडून गुटखा विक्रीसाठी आणल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.