गाडीवर लाल दिवा लावल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

0
378

पिंपरी, दि.५ (पीसीबी) – लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याची अनेकांची इच्छा असते. त्या इच्छेखातर प्रत्येकजण मेहनत करतो. पण काहीजण वेगळ्याच क्लुप्त्या वापरून ही इच्छा पूर्ण करतात. असाच एक प्रकार पिंपरी परिसरात समोर आला आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राजेंद्र बारशिंगे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक बारशिंगे आणि त्यांचे सहकारी, वरिष्ठांसह ऑटो क्लस्टर परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. ऑटो क्लस्टर बस स्टॉपजवळ त्यांना एक स्विफ्ट कार थांबली असून त्यावर लाल दिवा सुरु असल्याचे दिसले. एखादा राजपत्रित अधिकारी जात असताना गाडी बंद पडली असून मदतीच्या प्रतीक्षेत असल्यासारखे वाटल्याने गस्तीवरील पोलीस गाडीजवळ गेले. त्यावेळी गाडीत दोघेजण बसले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मुलांच्या घरात कोणीही राजपत्रित अधिकारी नाही. केवळ त्यांना लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे आकर्षण असल्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी कार आणि आणि लाल दिवा जप्त केला आहे. याप्रकरणी 17 आणि 18 वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.