गहुंजे येथे तरुणाचा खून करुन मृतदेह पवना नदीपात्रात टाकणाऱ्या आरोपींना अटक

0
676

गहुंजे, दि. २४ (पीसीबी) – सोमवार (दि.१५ एप्रिल) गहुंजे येथील पवना नदीपात्रात बोट क्लबच्या विरुद्ध दिशेला एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृताच्या हातावरील गोंदलेल्या ओम आणि आई या दोन शब्दांमुळे मृताची ओळख पटवण्यात तसेच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात तळेगाव दाभाडे पोलिसांना यश आले आहे.

मंगेश ऊर्फ दाद्या अनंत भागवत (वय ३८, रा. सोमाटणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्रीकांत मुऱ्हे, स्वप्नील काळे, प्रवीण ऊर्फ बारक्या शेडगे या तिघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा बेलमेंडा स्कीमजवळ पवना नदीपात्रात बोटक्लब चालविण्यात येतो. या क्लबच्या विरुद्ध दिशेला गहुंजे येथे १५ एप्रिलला एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेह खूप जास्त कुजलेला असल्याने मृताची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सरकारी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कानडे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. डॉ. कानडे यांनी मृतदेहाची पाहणी करून डोक्यात तीक्ष्ण घाव घालून खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर सहायक निरीक्षक कुंदा गावडे यांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद दिली होती.

दाद्याबाबत कोणतीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. केवळ हातावर ओम आणि आई असे गोंदल्याचे दिसून आले होते. दरम्यान, सोमाटणे येथे राहणाऱ्या दाद्याच्या हातावर अशा प्रकारे गोंदलेले असून, तो काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती खबऱ्याकडून सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता, तो बेपत्ता असूनही नातेवाइकांनी तक्रार दिली नसल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपासून श्रीकांत मुऱ्हे याच्या वयोवृद्ध वडिलांना दाद्या सातत्याने शिवीगाळ करून त्रास देत असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी मुऱ्हे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी रक्ताने माखलेला शर्ट आणि चप्पल पोलिसांना आढळली. दाद्याच्या मुलीने चौकशीत हे कपडे दाद्याचे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर प्रथम श्रीकांत आणि त्यानंतर स्वप्नील आणि प्रवीण या दोघांना अटक करण्यात आली.