आता बारामतीच्या टग्याचे सगळे नटबोल्ट ढिले करतो – विजय शिवतारे

0
999

पुणे, दि. २४ (पीसीबी) – पुरंदरचे शिवसेना आमदार व जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. मी इंजिनिअर आहे. त्यामुळे मला नट बोल्ट आवळता येतात आणि ढिल्लेही करता येतात, आता बारामतीच्या टग्याचे सगळे नटबोल्ट ढिले करतो,  असा शब्दांत शिवतारे यांनी  अजित पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शिवतारे बोलत होते. या प्रचारसभेसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी   शिवतारे यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवार यांनी आपल्या  खास शैलीत  शिवतारे यांच्यावर निशाणा साधला होता. शिवतारे यंदा तु कसा  आमदार होतो तेच बघतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवारने एकदा ठरवले की ठरवले,  असे पवार म्हणाले होते.

यावर शिवतारे यांनी  अजित पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये  आमदार कोणाला करायचा हे जनता ठरवते. त्यामुळे अजित पवार नव्हे, तर मी आमदार होणार की नाही, हे पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल, असा पलटवार त्यांनी  अजित पवार यांच्यावर केला होता .