खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

0
244

खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेना (शिंदे गट) उपनेतेपदी नियुक्त

– मोदी मंत्रीमंडळातही बारणे यांना राज्यमंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बारणे यांच्याकडे उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, शिवसेना फुटीनंतर ११ खासदारांचा एक गट शिंदे यांच्या बरोबर आल्याने त्या गटाला केंद्रीय मंत्रीमंडळात दोन मंत्रीपदे मिळणार असून त्यात बारणे यांचेही नाव आघाडीवर असल्याचे समजते.

खासदार बारणे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर, मावळातील शिवसेना पदाधिका-यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पिंपरी विधानसभाप्रमुख राजेश वाबळे, सरिता साने, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, अंकुश देशमुख, सुरेश राक्षे, प्रदिप दळवी, दीपक गुजर, विलास जगदाळे, नंदू जाधव, माऊली जगताप, निलेश हाके, राजेंद्र तरस, प्रशांत कडलक, रोहित माळी, शैला पाचपुते, शैला निकम, बशीर सुतार, रुपेश चांदिरे, पोपटराव चौधरी, जयसिंगराव मगर, सुरेक्ष राक्षे, गणेश खानेकर, हेमचंद्र जावळे, अंकुश कोळेकर, मयुरी सावंत, रवींद्र ब्रह्म, दत्ता रसाळ, संभाजी काळभोर आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत २२ वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला. 2014 मध्ये शिवसेनेकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे देशाच्या लोकसभेत गेले. पुन्हा 2019 च्या निवडणुकीतही सलग दुस-यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी होत बारणे यांनी संसद गाठली. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मागील सात वर्षे सलग संसदरत्न, महासंसदरत्न, विशिष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. आता पक्षाने त्यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी सोपविली आहे. शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करत खासदार बारणे यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नेमणूक झाली आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारच्या योजना शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्या जातील. जनतेला, शिवसैनिकांना सत्ताचा फायदा मिळवून दिला जाईल. शिवसैनिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशिल राहील. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला हा विश्वास सार्थ करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन”.