खड्डे व चिखल असल्याने आंदर मावळातील रस्ते नामशेष

0
480

मावळ,दि.३०(पीसीबी) – आंदर मावळातील करंजगाव-साबळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या “साबळेवाडी” या लहानशा वस्तीला करंजगावसह तालुक्याच्या इतर भागाशी जोडणारा मुख्य रस्ता “नामशेष” झाला असून सर्वत्र चिखल,घाण पाण्याने तुंबलेली डबकी व खड्डेच दिसत असल्याने या रस्त्याचे अस्तित्व केवळ कागदोपत्री उरले आहे.

करंजगाव या मुख्य गावच्या अंतर्गत असलेली “साबळेवाडी” ही जेमतेम पस्तीस घरे व दीडशेच्या आसपास लोकसंख्या असलेली वस्ती आहे.या वस्तीला मुख्य गाव व तालुक्याच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव मुख्य रस्ता येथील नागरिकांसाठी सोईचा ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरू लागला आहे.या रस्त्याची मागील कित्येक वर्षे साधी डागडुजीसुध्दा करण्यात आली नाही.परिणामी सर्वत्र मोठमोठे खड्डे व त्यात तुंबलेले घाण पाणी यामुळे रस्ता कुठे आहे हेच नागरिकांना कळत नाही.रस्त्याने पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी ,नोकरदार, दुग्ध व्यावसायिक यांना तर घाण पाण्यानेच अभ्यंगस्नान करण्याशिवाय चालताच येत नाही.रात्रीच्या वेळी रस्त्यावर पथदिव्यांची सोय नसल्याने अंधारात चाचपडत मार्ग काढावा लागतो.

स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटली तरी औद्योगिक आघाडीवर पुढारलेल्या व एकरी कोट्यवधीचा भाव असलेल्या मावळात एका वस्तीला जाण्यासाठी साधा रस्ताही अस्तित्वात नसावा हे दुर्दैव आहे.त्यामुळे त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिल्याच्या वल्गना केल्या तरी तालुक्याच्या अंतर्गत भागातील मूलभूत सुविधा पाहता हा निधी कोणत्या “खड्डयात” गेला हेच जनतेला कळेनासे झाले आहे.

येत्या काही महिन्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसह लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचीही निवडणूक होणार आहे.त्यामुुळे नगरसेवकां पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य सर्वचजण “बॅनरबाजी” करत कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिल्याच्या वल्गना करत आहेत.प्रत्यक्षात मात्र तालुक्याच्या दुर्गम भागात रस्ते,पाणी,वीज अशा मूलभूत सुविधाही मिळण्याची भ्रांत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधींची “शोगिरी जास्त आणि कामगिरी कमी” असे वास्तव आहे.