‘क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर…’

0
462

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे ! आजच्या अत्यंत व्यक्तिकेंद्रीत, संकुचित, ‘अर्थ आणि काम’ यांभोवती गुंजी घालणार्‍या आणि जातीयवादी साहित्याच्या तुलनेत उत्तुंग, उज्ज्वल अन् महन्मंङ्गल असे जगण्याचे एक उदात्त ध्येय समोर ठेवणार्‍या अविस्मरणीय अशा साहित्याची निर्मिती भाषाप्रभू आणि विद्वतप्रचूर सावरकरांनी केली. ‘राष्ट्र’ हेच त्यांचे जीवनमूल्य असल्याने त्यांचे एकमेवाद्वितीय साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच प्रसवलेले आहे. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा यासम हाच !’

“अंदमानाच्या कारावासात पाठवण्याच्या आधी कारागृहातील शेवटच्या भेटीत स्वा.सावरकरांनी आपल्या तरुण पत्नीला केलेला उपदेश !”

‘‘….बरें ईश्वराची दया असेल, तर पुनः भेट होईलच. तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुला-मुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणावयाचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत; पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल, तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूल-बोळकी आपण फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारोजणांच्या घरी धूर निघेल आणि घर घर म्हणून करीत असतांनाही प्लेगने नाही का शेकडो जणांची घरे ओसाड पाडली, लग्नाच्या मंडपातून नवरा-नवरीस विलग हिसडून मृत्यूच्या दाढेत ढकलून दैवाने जोडपी विजोड करून टाकली ! असा विवेक करून संकटास तोंड द्या.’’ – स्वा. सावरकर

“देशभक्तांचे रक्त सळसळविणारी स्वा. सावरकरांची लेखणी!”

‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’ सावरकर थांबले, गुप्तचरांनी झडती घेतली. काहीच सापडले नाही ! तेव्हा गुप्तचरांचा प्रमुख अधिकारी सावरकरांना म्हणाला, ‘‘क्षमा करा. चुकीच्या बातमीमुळे तुम्हाला त्रास झाला.’’ सावरकर म्हणाले, ‘‘तुम्हाला मिळालेली वार्ता चुकीची नाही. माझ्यापाशी भयंकर घातक हत्यार आहे.’’ खिशातील झरणी (पेन) दाखवून सावरकर म्हणाले, ‘‘हे पहा, ते हत्यार ! यातून निघणारा एकेक शब्द तरुणांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या शब्दांनी देशभक्तांचे रक्त सळसळते आणि ते राष्ट्र्रासाठी तळहातावर शिर घेऊन लढण्यास सिद्ध होतात !’’

“राष्ट्राचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता असली पाहिजे!”

१९३८ साली मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून साहित्यिक सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात स्वा. सावरकर म्हणाले, ‘‘आता सरते शेवटी मला हे सांगितल्यावाचून गत्यंतरच दिसत नाहीr. ‘साहित्य हे आजच्या आपल्या राष्ट्राच्या परिस्थितीत दुय्यम-तिय्यम कर्तव्य आहे. साहित्यिक सज्जनहो, सूज्ञहो, साहित्यासाठी जीवन आहे कि जीवनासाठी साहित्य ? आपले साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो उपासक त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल; पण असे उपासक त्या कलानंदात एखाद्या नाट्यगृहामध्ये रंगून गेले असता, जर त्या नाट्यगृहालाच आग लागली, तर कलेसाठी कलेला झिडकारून ते प्रथम जीव वाचवण्याच्या मार्गास लागतील. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची काय कथा ?’

“स्वातंत्र्य संपादनाचे श्रेय देवाला केलेल्या अबोल प्रार्थनेलाही!”

भारत स्वतंत्र करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते गेल्या दोन पिढ्यांतील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की, सशस्त्र वा निःशस्त्र अशा कोणत्याही गुप्त वा प्रकट चळवळीत ज्यांनी सक्रिय भाग घेतला नाही; परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृदयात एक सहानुभूती बाळगली आणि ‘देवा, माझ्या भारताला स्वतंत्र कर’ म्हणून अबोल प्रार्थना केल्या, त्या आमच्या लक्षावधी स्वदेशबांधवांनाही या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे़. – स्वा. सावरकर, १९५२

“कोणी हल्ला केलाच, तर मारत, मारत मरणे मला आवडेल’, असे वृद्धावस्थेतही म्हणणारे स्वा. सावरकर!”

श्री. पु. गोखले यांनी वृद्धावस्थेतील स्वा.सावरकरांना एकदा विचारले, ‘‘तात्या तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पहाता, आपण जो जांबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल ?’’ यावर सावरकर उत्तरले, ‘‘मी थकलो आहे, माझे वयही होत आले आहे, हे सगळे खरे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करेल, असा संभवही जवळजवळ नाहीच; पण हे सर्व आपण काही गृहीत कृत्ये धरून काढलेले निष्कर्ष आहेत. आपला निष्कर्ष बरोबर येत राहिला आणि आपण शस्त्रधारी राहिलो, तरी काही नुकसान होणार नाही; पण आपला तर्क चुकला तर ? स्वामी श्रद्धानंदांचा तर्क असाच चुकला होता. अब्दुल रशीदने या हिंदूंचा अंदाज चुकणार, हा अंदाज बरोबर केला होता. समज, उद्या माझ्यावर कोणी हल्ला केलाच, तर माझी प्रतिकारशक्ती कमी पडेलही. प्रतिकार कमी पडला नि मला पराभव पत्करावा लागला, तर कधीच वाईट वाटणार नाही; पण प्रतिकार न करता मी पतन पावलो, तर मला अतोनात दुःख होईल. ‘झुंजत रहाणे’ हे मी आयुष्यभर केलेले आहे. कोणी हल्ला केलाच, तर मारत, मारत मरणे मला आवडेल. शस्त्र वापरण्याची वेळ आयुष्यात सहसा येत नाही; पण कधीही न येईल अशी वाटणारी वेळ आलीच, तर नुसता पश्चाताप करून कार्यभाग साधत नाही. पुष्कळ वेळा नुसते शस्त्र जवळ आहे, यानेच काम भागते.’’
साहित्य : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विपुल लिखाण केले. त्यामध्ये अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, हिंदुपदपातशी, सहा सोनेरी पाने, शिखांचा इतिहास (अप्रकाशित) या व्यतिरिक्त विविध नाटके, कादंबरी इत्यादी आहेत.

असे थोर क्रांतिकारक, दूरदृष्टीचे नेते, लेखक, नाटककार आणि कवि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयोपवेशन करून २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे देह सोडला. स्वा.सावरकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संकलक : श्री. पराग गोखले, सौजन्य : हिंदु जनजागृती समिती