तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र भारताच्या फिरकीचे

0
353

अहमदाबाद, दि.२४ (पीसीबी) : भव्य दिव्य अशा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिले सत्र भारतीय फिरकीच्या नावावर लिहिले गेले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची अवस्था 6 बाद 81 अशी झाली होती. बेन फोक्स १ आणि जोफ्रा आर्चर ४ धावांवर खेळत होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. गोंधळात टाकणाऱ्या खेळपट्टीच्या स्वरुपाने घात केला. इंग्लंड कर्णधार ज्यो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, तिसऱ्याच षटकांत इशांत शर्माने डॉम सिब्लीला बाद केले. उसळत्या चेंडूंचा मारा करणाऱ्या इंशातच्या अशाच एका उसळत्या चेंडूने सिब्लीच्या बॅटची कड घेतली आणि स्लिपमध्ये रोहित शर्माने त्याचा झेल घेतला.

त्यानंतर दुसरा सलामीचा फलंदाज झॅक क्राऊलीने कमालीच्या आत्मविश्वासाने फलंदाजी केली. पण, समोरच्या बाजूने फिरकी गोलंदाजांसमोर त्याच्या सहकाऱ्यांनी नांगी टाकली. जॉनी बेअरस्टॉ सिब्लीप्रमाणेच खाते उघडू शकला नाही. संथ खेळणारा ज्यो रुटही विनाकारण बॅकफुटवर खेळण्याच्या नादात बाद झाला. अर्धशतक झळकावून सहज खेळणारा क्राऊलीने देखिल पॅव्हेलियनचा रस्ता धरला. पहिल्या सत्रात ४ बाद ८१ अशी मजल मारणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजीचे हाल दुसऱ्या सत्रातही कुणी खालले नाहीत. खाली राहणाऱ्या, वळणाऱ्या चेंडूंसमोर त्यांनी झटपट आणखी दोन गडी गमावले. पहिल्या दिवसाच्या दोन तासाच्या खेळातच भारताने सामन्यावर आपली पकड मिळवली आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने दोन, तर अश्विन आणि इशांतने प्रत्येकी एक गडी बाद केला. इशांतने आपला शंभरावा कसोटी सामना खेळताना भारताला पहिले यश मिळवून दिले. खेळ सुरू होण्यापूर्वी इशांतचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते इशांतचा सन्मान करण्यात आला. शंभर कसोटी खेळणारा इशांत कपिलदेव नंतर भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरला.

भारताने या सामन्यासाठी कुलदीपला वगळून फलंदाजीचा आधार घेत वॉशिंग्टन सुंदर आणि महंमद सिराजला वगळून जसप्रित बुमराला संधी दिली. इंग्लंडने ब्रॉडलाही संघात कायम ठेवताना ऑली स्टोन, मोईन अलीच्या जागी जोफ्रा आर्चर आणि जेम्स अॅंडरसन यांना स्थान दिले. त्याच वेळी रोरी बर्न्सला वगळून झॅक क्राऊली आणि लॉरेन्सच्या जागी जॉनी बेअरस्टॉला स्थान दिले.