केवायसी अपडेट आणि इंटरनेट बँकिंगच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक

0
229

मोरवाडी, दि. २० (पीसीबी) – केवायसी अपडेट करण्याच्या तसेच इंटरनेट बँकिंगच्या बहाण्याने अज्ञात इसमांनी एका महिलेची एक लाख 57 हजार 699 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 17 मे आणि 13 जून रोजी मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 19) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात इसमाने 8597861251 आणि 9775596198 या क्रमांकावरून केवायसी अपडेट करण्याबाबत मेसेज केला. केवायसी अपडेट न केल्यास तुमचे अकाउंट रद्द करण्यात येईल असेही मेसेजमध्ये सांगण्यात आले. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना मेसेज द्वारे लिंक पाठवली.

13 जून रोजी 9593552544 या क्रमांकावरून अज्ञात इसमाने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने ‘मी एसबीआय बँकेतून बोलत आहे. आपल्याला इंटरनेट बँकिंग करत असताना ओटीपी सेंड होत नाही, असे आम्हाला समजले आहे. तुम्हाला केवायसी बाबत आलेल्या मेसेज मधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करू शकता’, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने त्यांना आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेचे चाकण शाखा येथील खात्यामधून एक लाख 57 हजार 699 रुपये अज्ञातांनी ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.